त्यांना भरारी घेऊ द्या...Let them fly....

 

"तुमची मुलं ही तुमची मुलं नाहीत,
ती मुलं आणि मुली आहेत जीवनाची,
जीवनाला वाटणाऱ्या असोशीची,
तुमच्या माध्यमातून मुलं आली असली
तरी ती तुमच्यातून येत नाहीत,
ती तुमच्या बरोबर राहत असली
तरी ती तुमच्या मालकीची नाहीत."
                                  - खलील जिब्रान

     एक मूल..एक स्वतंत्र आयुष्य असतं. आपण त्यांना जन्म दिलाय म्हणून मुलं ही आपली मालमत्ता आहेत, आपण हवं तसं त्यांच्या सोबत वागू शकतो. त्यांना आपण अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देतो त्यांच्या गरजा पूर्ण करतो त्यामुळे मुलांनी आपलं ऋणी असावं. आणि आपले गुलाम बनून राहावं. त्यांच्या आयुष्याचा दिशा दर्शन पालकांच्या इच्छे नुसार व्हावं. कारण हे सर्व करतात म्हणजे पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात. त्यांना मुलांची काळजी असते.

प्रेम म्हणजे तरी काय असतं ?
आपण कधी विचार केलात का....
प्रेम.. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य.. प्रेम म्हणजे आदर..
प्रेम म्हणजे समानता.. प्रेम म्हणजे न्याय..

     पालकांचे मुलांवरती प्रेम आहे, त्यामुळे मुलांना स्वतंत्र द्यावं. मुलांचा आदर करावा. मुलांच्या स्वप्नांचा, मुलांच्या विचारांचा आदर करावा. मुलांना समानता द्यावी. त्यांच्या स्वप्नांना योग्य न्याय द्यावा. पण आपण आजूबाजूला बघतो. याच्या अगदी उलटं, जवळ जवळ प्रत्येक कुटुंबात. प्रेमाच्या नावाखाली पालक मुलांचे आयुष्य दाबून टाकतात. त्यांचे स्वप्न उध्वस्त करून टाकतात. पालकांना हवं त्यानुसार मुलांनी जगावं तरच मुलं आज्ञाधारक आहेत. मुलांनी पालकांच्या मना नुसार वागले तर च मुलांचं भलं होईल. अन्यथा मुलांचे भवितव्य अंधारात राहील. असे अनेक गैरसमज पालकांनी मनात बाळगून ठेवले आहेत.

     एका मुलाला एक व्यक्ती म्हणून स्वतः चे आयुष्य जगण्याचा, स्वतः चे विचार, स्वतःचे मूल्य जपण्याचा, स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याचा, स्वतःच्या स्वप्नांना पंख लावण्याचा, उंच भरारी घेण्याचा अधिकार आहे. तो त्यांचा हक्कच आहे.
त्यांना स्वतः ची वाट शोधायची असते. नवीन रस्त्यावरून चालायचा असतं. स्वतःच्या आयुष्या साठी त्यांचीही काही स्वप्न असतात जी मुलांना पूर्ण करायची असतात.
पालकांनी अवास्तव अपेक्षा करून मुलांचे पंख का छाटावे ? कारण पालकांना मुलांची काळजी आहे ! हेच विषय घ्यावे. याच विषयाचा अभ्यास करावा. याच शाखेत प्रवेश घ्यावा. पहिलाच नंबर आणावा. करण पालकांना माहीत असतं मुलांसाठी योग्य काय अयोग्य काय !  हे सत्य आहे का ? खरं तर हा एक खूप मोठा गैरसमज पालकांनी स्वतः च्या मनात करून घेतलाय.
मुलांनी शंभर टक्के प्रयत्न करणं महत्वाचं आहे. त्यांनतर त्यांचा पहिला दुसरा तिसरा असा कुठलाही क्रमांक आला तरी त्याने काही फरक पडणार नाही.

     मुल लहान असतं तेव्हा मुलांनी आपलं ऐकावं ही अपेक्षा.
मूल मोठं होत असेल तर मुलांनी आपल्या मनानुसार शिक्षण घ्यावं ही अपेक्षा.
आर्थिक दृष्ट्या स्थिर झाल्यावर आपल्या मनानुसार मुला- मुलीशी लग्न करावं ही अपेक्षा.
पालकांच्या अनेक इच्छा अनेक अपेक्षा..न थांबणाऱ्या न संपणाऱ्या..पालक सुद्धा कधीतरी मुलं होतीच.
    या गोष्टी बदलणे मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत. याची सुरुवात आपण आपल्या कुटुंब पासून करू शकतो.

     बदल घडवून आणण्यासाठी जेव्हा आपण ठाम पणे उभे राहतो तेव्हा तो बदल घडून येतोच.
आपण आपल्या मुलांना जन्मापासून अनेक गोष्टी शिकवतो. त्यातून ते नक्कीच शिकतात. पण त्याहून अधिक ते अनुकरणाने शिकतात.
पालक जर स्वतः एकमेकांना आदर- सन्मान देत असतील.
     मुलांच्या बोलण्याचा आदर करत असतील. मुलांचा सन्मान करत असतील. मुलं देखील सक्षम आणि पात्र आहेत हे समजून त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ देत असतील. या सर्व गोष्टी जर कुटुंबाच्या कृतीतून दररोज दिसत असतील तर मुलं सुद्धा हे अनुकरणातून शिकतील आणि त्यांच्या आयुष्यात अमलात आणतील.

     मुलं ऐकत नाहीत. म्हणून दोष फक्त मुलात असतात असं नाही. दोष कोणात नसतात ?  दोष पालकांमध्येही असू शकतात. मात्र, ज्या क्षणी मुलांना पालकांच्या दोषांची जाणीव होते त्या क्षणी ते दोष त्यांना खूप काही शिकवून जातात.
     पालकांचा अट्टाहास सुद्धा अनेक बाबतीत दिसून येतो. मुलांनी पालकांच्या मनाप्रमाणे वागावं. मुलांनी सांगितलं ते ऐकावा. मुलांना काही कळत नाही. पालकांना मुलांच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मुलांना स्वतःच्या आयुष्यात स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यात मुलगी असेल तर तिच्या कडून करण्यात येणाऱ्या अपेक्षा तर... मुलींचे स्वप्न, तिच्या ईच्छा यांना समाजात काहीच किंमत नसते. स्त्रियांच्या हातात सत्ता नाही, स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, मुलींना शिक्षण नाही, म्हणजेच स्त्रियांच्या नशिबी केवळ गुलामगिरीचे जीवन तेवढं येतं. म्हणूनच पुरुषसत्ताक समाजामध्ये स्त्रिया ओझं बनून राहतात.
     तसेच समाजात, अथवा घरी आलेल्या पाहुण्या समोर अनेक वेळी आपल्या मुलांना टोमणे मारताना, नावं ठेवताना दिसून येतात. याने मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. जो मुलांचे व्यक्तीमत्व खुजे करतो. पालकांच्या या अपेक्षा असतात की मुलांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात पालकांच्या ईच्छा पूर्ण कराव्यात. पालकांचे आयुष्य मुलांनी जगावे. जे की मानवी मूल्यांच्या अगदी विरुद्ध आहे.
     त्यात आपल्या समाजात मुलगा आणि मुलगी यांच्या जडण घडणी मध्ये भेदभाव केला जातो. मुलांना घडवताना त्यांना वंशाचा दिवा गृहीत धरून त्यांच्या साठी नेहमीच झुकते माप दिलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, भौतिक गरजा या सर्वांच्या बाबतीत मुलांना नेहमीच प्रथम प्राधान्य देण्यात येतं. आणि त्या विरुद्ध मुलींना घर-काम, धुनी-भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. त्यात तिच्या आवडी- निवडी, गरजा या सर्वांना दुय्यम दर्जा दिला जातो. मुलांना मात्र घर कामातून सपशेल सुट्टी असते. ही असमानता सर्वच ठिकाणी पाहायला मिळते. एक सून म्हणून तर मुली कडून अनेक अपेक्षांचे ओझे उभा असते. आधी मुलगी म्हणून आणि नंतर सून म्हणून अनेक बंधने तिच्या वर लादली जातात. अतिशय कमी वयात मुलींचे लग्न केले जातात. त्याच सोबत त्यांच्या वर संसाराची जबादारी पडते. समाजात पुरुष प्रधान संस्कृती मुळे स्त्रिया आर्थिक दृष्ट्या स्वावलांबी नसतात. म्हणूनच नवऱ्याला बायकोच ओझं होत असतं.
     जगभरातील प्रत्येक देशात प्रत्येक शहरात आणि प्रत्येक खेड्यात आजही कित्येक मुली शिक्षण पासून वंचित आहेत. त्यांची संख्या 13 कोटींहून आधीक आहे. मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाचा विचार प्राधान्याने केला जातो. ज्या दिवशी आई वडील मुलींच्या लग्ना ऐवजी त्यांच्या शिक्षणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी पैसे जमा करतील आणि मुलींच्या लग्ना ऐवजी त्यांच्या शिक्षणाला आणि भविष्याला ते पैसे लावतील त्या दिवसा पासून त्या समाजाची आणि परिणामी देशाची वाटचाल नवीन प्रगत युगाच्या दिशेने सुरू होईल. ज्या दिवशी मुलींच्या हातात भांडे, धुणे, बेलन, बांगड्या. या ऐवजी वही पुस्तक पेन दिल्या जाईल आणि त्या साठी घरा घरातून याला पाठिंबा दिला जाईल त्या दिवशी त्या समाजाचे आणि देशाचे भवितव्य बदलल्या शिवाय राहणार नाही.
     पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या देशांमध्ये जोवर स्त्री सुद्धा आपणहून पुढे येत नाही, तोवर बदल प्रत्यक्षात आणण कठीण जातं. मुलींना सशक्त करायचं असलं तरी त्यासाठी मुलांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना कमकुवत करणं अयोग्य आहे. मुलांच्या वाढी कडे त्यांच्या गरजांकडे सुध्दा लक्ष पुरवणं तितकंच आवश्यक आहे.
     एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक, एक पेन, संपूर्ण जगाला बदलू शकत.. शिक्षण हा एकमेव उपाय आहे. शिक्षणाला अग्रक्रम हवा.
     जसजशी मुलं मोठी होतात तसतसं त्यांना त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगू द्यायला हवं. त्यांच्या बाबत वाटणाऱ्या मालकी हक्काच्या भावनेतून बाहेर येणं गरजेचं आहे . मुलं जितकी स्वतंत्र होतील तितकी ती स्वतःच आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगू लागतील. एक माणूस म्हणून योग्य प्रकारे वागू लागतील. हीच त्यांच्या वरील प्रेमाची पावती असेल. जर पालक खरंच त्यांच्या मुलांवर प्रेम करत असतील तर लग्नाची घाई करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्या पेक्षा मुलांना त्यांच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी पालकांनी तत्पर असावं.
    समाजातील 90 टक्के लोक असे असले तरी काही 10 टक्के लोक असेही आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांना आयुष्यात महान व्यक्तिमत्व घडविण्यास सदैव पाठिंबा दिलाय. जसे की
     फ्रान्सचा बादशहा.. अर्ध्या युरोपचा स्वामी नेपोलियन बोनपार्ट याच्या आई वडिलांनी सदैव त्यांना स्वतःच्या दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शेवट पर्यंत खंबीर पाठिंबा दिला.
     जगात ज्यांना ज्ञान सूर्य म्हणून ओळखले जाते ते परम पूज्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. यांचे पालक म्हणून सुभेदार रामजी सकपाळ आणि माता भीमा बाई यांनी आई वडील म्हणून पालक या नात्याने नेहमीच बाबासाहेबांच्या शिक्षणाला खांबीर पाठिंबा दिला.
     दिल्ली सल्तनत ची पहिली महिला राज्यकर्ती रजिया सुलतान हिचे वडील दिल्लीचे सुलतान शमसुद्दीन इल्तमश नेहमीच तिच्या पाठीशी खंबीर पणे उभे होते.
     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ साहेब यांनी शिवरायांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास शिक्षणा कडे जातीने लक्ष पुरविले.
     इंदोरचे राज्यकर्ते.. होळकर घराण्यातील सून कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर यांचे बालवयात लग्न झाले असताना त्यांचे सासरे मल्हारराव होळकर आणि त्यांच्या सासूबाई यांनी अहिल्या बाईंच्या शिक्षण कडे स्वतः लक्ष पुरविले.
     सध्याचे उदाहरण द्यायचे झाले तर मलाला युसुफझई हीचे देता येईल. एक मुलगी म्हणून मालाला आणि तिचे दोन भाऊ या तिघांना एक व्यक्ती म्हणून घडवताना त्यांचे आई वडील झियाझुद्दीन युसुफझई आणि तूर पेकई हे दोघे ही पालक म्हणून त्यांच्या मुलांच्या पाठीमागे त्यांच्या निकोप भविष्या साठी खंबीर पणे उभा आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 2 मध्ये दिनांक 20 जुलै 1942 रोजी झालेल्या ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस वूमन्स कॉन्फरन्स च्या मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात.

....स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे . त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी जाणतो. सामजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. माझ्या स्वतः च्या अनुभव वरून ही मी हे सिद्ध करून देईन. दलित वर्गामध्ये काम करण्यास जेव्हा पासून मी सुरुवात केली तेव्हा पासून पुरुषाबरोबर स्त्रिया ही सहभागी झालेल्या आहेत . म्हणूनच आपल्या परिषदा मिश्र परिषदा आहेत असे दिसून येईल. स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली  असेल त्या वरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजीत असतो. म्हणूनच हा समुदाय पाहिल्या वर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केलेली आहे. तुम्ही मनात नीट जपुन ठेवाव्यात अश्या काही थोड्याश्या गोष्टी तुम्हास सांगतो.
     स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळू हळू त्यांच्या मनात महत्वकांक्षा जागृत करा. ते थोर होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्या तील हिनगंड नाहीसा करा. लग्न करण्याची घाई करू नका . लग्न म्हणजे जबाबदारी. लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार पाडण्या इतपत आर्थिक दृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांच्या वर लग्न लादु नका. जे लग्न करतील त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, अति जास्त मुले होणे हे दृष्ट कृत्य आहे . आपल्या लहानपणी आपल्याला मिळू शकली त्या पेक्षा अधिक चांगली पारिस्थिती आपल्या प्रत्येक मुलाला देणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे. सर्वात अधिक महत्त्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलाम सारखे वागण्यास खंबीर पणे तिने नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा. या उपदेशाचे तुम्ही पालन केले तर तुम्हा सर्वांना मानसन्मान व कीर्ती प्राप्त होईल. एवढेच नव्हे तर दलित वर्गालाही सन्मान व कीर्ती मिळेल अशी खात्री आहे.


     पालकांनी कसे असावेत ?
पालकांनी मुलांचं मन घडवण्यापेक्षा मुलांचं व्यक्तिमत्व घडवावं. त्यांना निकोप वातावरण तयार करून द्यावं.
हे जग उघड्या पुस्तका सारखं आहे. मुलांना हे जग वाचू द्यावं. प्रत्येक अनुभव मुलांसाठी नवीन असतो त्यांना तो घेऊ द्यावा. मुलांना बहरू द्यावं. हे जग बदलत आहे. बदलत असतं.. येणाऱ्या नवीन युगासाठी मुलांना घडवण्यासाठी, आपण पालक म्हणून कटिबध्द असावं. मुलांच्या मनात येईल ते ती साध्य करतील यासाठी त्यांना सक्षम बनवावं.
     जिथे मुलांना पालकांचा पूर्ण पाठिंबा आहे. जिथे मुलांच्या क्षमतांना वाव मिळतो. जिथे मुलांच्या पंखात उडण्याची ताकद भरली जाते. जिथे स्वमतानुसार यशस्वीरीत्या आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण केला जातो तिथे खऱ्या अर्थाने मुलांचं निकोप आयुष्य आकार घेतं..

     "या पृथ्वी तलावर जन्म घेणारी ती सर्वात हुशार आणि सुंदर व्यक्ती आहे"
     हा समज आपल्या मुलांत जोपासण्यासाठी प्रत्येक पालकाने प्रयत्न करावा. मात्यपित्याची आपल्या मुलाप्रति - मग तो मुलगा असो की मुलगी - ही पालक म्हणून आपली सर्वप्रथम जबाबदारी आहे.
तुम्ही मुलांना घडवू शकत नाही. एक पालक म्हणून तुम्ही स्वतःच्या कृतीतून आणि जपलेल्या मूल्यांतून त्यांना प्रेरित करू शकता...त्यांना आकाशात उंच उडू द्या...त्यांना भरारी घेऊ द्या...

     आजच्या अत्यंत महत्वाच्या दिवशी परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे. या दिवशी आपण सर्वांना जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा...

THE PAYMENT STIGMA MUST READ

Comments