India's first Training School for Entrance to Politics by Dr. B. R. Ambedkar (M.A., Ph.D., M.Sc., D.Sc., Bar-at-law, LLD, D.Lit.)

                 ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स

     भारतीय संविधानाने अंगीकारलेल्या संसदीय प्रणालीतील केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळातील प्रतिनिधींचे व्यक्तीमत्व शील आणि प्रज्ञायुक्त असावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मनोमन इच्छा होती. या संदर्भात 23 नोव्हेंबर 1950 रोजी त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात आपले विचार व्यक्त केले आहेत.

     उत्कृष्ट संसदपटू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नेतृत्वात निर्मिती होण्याच्या उद्देशाने त्यांनी मुंबई येथे 'ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स' सुरू केले. या संस्थेचे संचालक स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शां. श. रेगे हे रजिस्ट्रार होते. या संबंधीची माहिती खालील प्रमाणे आहे--संपादक
     " देशातील लोकशाहीविषयक विचाराला आणि कार्याला परिणामकारक चालना मिळावी, त्याचप्रमाणे आपल्या नियोजित रिपब्लिकन पक्षामध्ये तरुणांची भरती होत राहावी ह्या हेतूने राजकारणात प्रत्यक्ष भाग घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी मुंबई येथे एक प्रशिक्षण विद्यालय (ट्रेनिंग स्कूल) सुरू करावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठरविले. ग्रंथपाल शां. श. रेगे यांच्या साहाय्याने ते प्रशिक्षण विद्यालय स्थापण्यासंबंधी ते खटपट करीत होते. जे विधिमंडळात कामकाज करण्याची महत्वाकांक्षा बाळगतात त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या प्रशिक्षण विद्यालयात करावयाची होती. त्या प्रशिक्षण विद्यालयाच्या मुख्याध्यापकाच्या जागेसाठी त्यांना लायक व्यक्ती पाहिजे होती. शिक्षक होऊ इच्छिणारा मनुष्य आपल्या विषयात प्रवीण पाहिजे. त्याला उत्तम रीतीने व्याख्यान देता आले पाहिजे. त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक पाहिजे. विद्यालयाचा लौकिक शिक्षकांच्या कर्तृत्वावर आणि वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर बराच अवलंबून असतो, असे त्यांनी रेग्यांना लिहिले. 1 जुलै 1956 ते मार्च 1957 पर्यंत शां. श. रेगे यांच्या देखरेखीखाली ते प्रशिक्षण विद्यालय चालले. त्याचे संस्थापक आणि चालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्या विद्यालयाला भेट देण्याचा योग आला नाही हे दुर्दैव. ते प्रशिक्षण विद्यालय त्यांच्या मृत्यू नंतर पोरके होऊन बंद पडले. ते विद्यालय अत्यंत उपयुक्त ठरले असते. राज्यकारभाराला योग्य वळण लावण्यासाठी जाणत्या नि लायक, तज्ज्ञ नि कर्तृत्ववान आमदारांचा नि खासदारांचा विधिमंडळांना नि लोकसभेला पुरवठा झाला असता !"

     "संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा तिक्ष्ण तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भारून टाकू शकतो तोच सभासद यशस्वी होऊ शकतो." संसदीय वक्तृत्वाबद्दल बाबासाहेबांनी काढलेले हे उद्गार त्यांनी आपल्या संसदीय कारकीर्दीमध्ये सार्थ करून दाखविले. कोणत्याही संसदीय संस्थेत निवडून गेलेला प्रतिनिधी हा कार्यक्षम असला पाहिजे. लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते सोडविण्याचे सामर्थ्य आणि विचारशक्ती ह्याची त्याने प्राप्ती केली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जाणिवेने आपल्या जीवनात अखेरच्या पर्वात मुंबईत जुलै 1956 पासून संसदीय शिक्षण देणारी एक आदर्श संस्था 'ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स' स्थापन केली होती. त्यात राजकारण, अर्थशास्त्र, अंदाजपत्रक, कामगार संघटना, संसदीय कामकाजाविषयी नियम आणि परंपरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर वक्तृत्व साधनेला प्राधान्य दिले होते. खुद्द बाबासाहेब ह्या संस्थेचे संचालक होते. दुर्दैवाने त्यांच्या अकस्मात परिनिर्वाणाने एका प्रभावी वक्त्याच्या मार्गदर्शनाला ही संस्था आणि तिचे उत्सुक विद्यार्थी मुकले."




संदर्भ ग्रंथ -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 20 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता 1929 ते 1956) 

Comments