देवांनाम प्रियदर्शी...

   प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास तो सम्राट अशोका शिवाय अपूर्ण आहे. सम्राट अशोक ... जम्बूद्वीपातील एक चक्रवर्ती सम्राट. देवनांप्रिय 'जो देवांचा सुद्धा प्रिय' होता असा अशोक. काही वेळा याला 'असोक' असेही लिहितात. याचा अर्थ होतो 'शोक विरहित' असा अशोक....



     प्राचीन भारताच्या इतिहासात मौर्य साम्राज्य हे एक बलाढ्य साम्राज्य अस्तित्वात होते. या साम्राज्याची उभारणी केली चंद्रगुप्त मौर्याने. या मौर्य साम्राज्याचा तिसरा सम्राट होता अशोक. हा एकमेव असा प्राचीन भारताचा शासक होऊन गेलाय ज्याने स्नेहभाव आणि धम्मा नुसार राज्य केले. धार्मिक सहिष्णुता आणि वैश्विक बंधुभाव या तत्वानुसार त्याने शासन केले आणि स्वतःचे ना भूतो ना भविष्यती असे स्वतःचे एक आकर्षक, अढळ असे स्थान इतिहासात निर्माण केले आहे.
     त्याने अनेक स्तूप उभारलेत. अनेक शिलालेख कोरून ठेवलेत. ज्या वरून आज 2500 वर्षां नन्तर सुद्धा आपल्याला अशोका बद्दल माहिती होते. भारताच्या राष्ट्र ध्वजावरती असलेले 24 आऱ्या चे अशोक चक्र हे भारताच्या महान सम्राटाला दिलेली मानवंदनाच आहे. त्याच सोबत भारताची राजमुद्रा असलेले 4 दिशांचे 4 सिंह हे सुद्धा सम्राट अशोकाची मुद्रा होती. हा लेख म्हणजे एक जीवन इतिहास आहे आणि इतिहासातला एक सुवर्ण काळ आहे या महान अजिंक्य सम्राट अशोकाचा. ज्याने सर्वां वरती बळाने नाही प्रेमाने विजय मिळवला...



     अशोक हा चंद्रगुप्त मौर्याचा नातू आणि बिंदूसाराचा मुलगा होता. अशोक गादीवर बसला ई. पू. 269 ला आणि त्याचा मृत्यू झाला ई. पू. 232 ला. आपल्याला अशोकाची ओळख झाली ती त्याने कोरून ठेवलेल्या शिलालेख आणि स्तूपावरून जे भारतात आणि भारता बाहेर आशिया खंडात अनेक ठिकाणी आढळून आलेत.



     ई. पू. 321 ला प्रथम मौर्य राजा चंद्रगुप्त हा गादीवर आला. त्याचा मुलगा बिंदूसार व सुभद्रानगी यांच्या पोटी अशोकाचा जन्म झाला. लहान असल्या पासूनच अशोक हा खेळकर आणि खोडकर मुलगा होता. त्या सोबतच तो एक अत्यंत कुशल शिकारी होता. दिसायला जरी तितका आकर्षक नसला तरीही पराक्रम, शौर्य, गौरव, धाडस, सहसिवृत्ती आणि प्रशासन चालवण्याचे कौशल्य या बाबतीत अशोकाची बरोबरी दुसरा कुठलाही राजकुमार करू शकला नाही. राजकुमार असल्या पासूनच अशोका विषयी सर्वांनाच आदर आणि प्रेम होते. अशोका मधल्या या सर्व गुणांची ओळख बिंदूसार राजाला खूपच लवकर झाली आणि त्याने तरुण वयातच अशोकाला 'अवंती'चा राज्यपाल म्हणून नियुक्त केले. 'उज्जैन' ही 'अवंती'ची राजधानी होती त्याच बरोबर एक ज्ञानाचे माहेरघर म्हणूनही ओळखल्या जायची. वैभव आणि कला यांचा संयुक्त मिलाप या ठिकाणी पाहायला मिळे. अशोक एक कुशल मुत्सद्दी म्हणून पाहायला मिळाला. या शहरात असतानाच त्याने विदिशा नगराच्या एक व्यापाऱ्याच्या मुलीशी शाक्य कुमारीशी विवाह केला. पुढे शाक्य कुमारी हीच संघमित्रा आणि महेंद्र यांची माता म्हणून ओळखल्या जाते.


     असेच एकदा तक्षशिला या ठिकाणच्या नागरिकांनी उठाव केला . हा उठाव दाबण्यासाठी बिंदूसारने त्याचा मोठा मुलगा सुशीमा याला पाचारण केले परंतु तो असफल ठरला. त्या ऐवजी अशोकाला पाठवण्यात आले. अशोकाकडे कमी फौजफाटा असून सुद्धा अशोकाची रवानगी होताच एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. तक्षशिलाचे उठाव करणारे नागरिक अशोकाला शरण आले आणि सत्य परिस्थिती समजून घेऊन अशोकाने दोषींना शिक्षा केली आणि बाकी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि परत आला. दिवस आणि महिने जात राहिले आणि बिंदूसार राजा वृद्ध झाला. त्या ऐवजी गादीवर कोण बसणार ? यासाठी विचार सुरू झाला. बिंदूसारचा मोठा मुलगा सुशीमा हा गादीचा वारस होता परंतु त्याची दुर्बलता तक्षशिला च्या प्रसंगी दिसून आली मग त्या ऐवजी अशोक हा शासन करण्यास पात्र म्हणून बिंदूसार राजाच्या मृत्यू नन्तर गादी वर आला.
     बिंदूसारचा मृत्यू ई. पू. 372 ला झाला. त्यांनतर राधागुप्त या प्रधान मंत्र्याने अशोकाला मगध साम्राज्याची धुरा सांभाळण्यास उज्जैन वरून पाटलीपुत्र या ठिकाणी येण्यास विनंती केली. हे नक्की कधी झाले ते सांगता येणार नाही परंतु सुशीमाला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळाल्या नन्तर तो गादी वरती हक्क सांगण्यास फौज घेवून येत होता. तो शहराच्या प्रवेश द्वारातून आत येत असताना त्याचा मृत्यू झाला. अशी एक गोष्ट सांगितली जाते की, राज्याच्या भवितव्यासाठी अशोकाने त्याच्या सर्व भावंडांना मारून टाकले पण या गोष्टीला काहीच ऐतिहासिक पुरावा नाहीये. अशोकाच्या शिलालेखांमध्ये त्याने स्वतःच्या भावंडांबद्दल अत्यंत प्रेमाने आणि स्नेहापूर्ण उल्लेख केलेला आढळून येतो.
     ई. पू. 268 ला ज्येष्ठमासा च्या 5 व्या दिवशी अशोकाचा राज्याभिषेक झाला. मंगलमय वातावरणात अशोकचा राज्याभिषेक समारंभ पार पडला. पाटलीपुत्रचे नागरिक अत्यंत आनंदात होते की एका सक्षम राजाच्या हाती मगध साम्राज्याची धुरा देण्यात आली. इतिहासात अनेक राजे होऊन गेले पण अशोका सारखा इतका अफाट साम्राज्य सांभाळणारा सम्राट दुर्मिळच. भारत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, नेपाळ, बंगाल, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, या ठिकाणी पसरलेल्या अफाट साम्राज्याची धुरा अशोकाच्या हाती होती. हे या सर्व ठिकाणी आज वर आढळून आलेल्या शिलालेखावरून दिसून येते. अशोकाने अत्यंत कुशल पद्धतीने शासन केले. त्याला प्रजेचा मित्र म्हणून सुद्धा ओळखले जायचे.


     कौटील्य जो चंद्रगुप्त मौर्याचा प्रधान मंत्री होता, त्याने राजाची दिनचार्य कशी असावी ? हे आखून दिले होते. ते असे, राजाने पहाटे 3 वाजता उठावे. अर्धा तास पर्यंत साम्राज्यासंबंधी अनेक गोष्टींचा आढावा आणि महत्वाचे निर्णय घ्यावेत. त्या नन्तर गुरुजन आणि पुरोहितांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यांनतर वैद्य आणि स्वयंपाक्यांना भेटावे. त्या नन्तर न्यायालयात जावे, सकाळी 6 ते 7 पर्यंत आदल्या दिवसाचा महसूल आणि खर्चाचा आढावा घ्यावा. 7.30 पासून राजाला महत्वाच्या गोष्टीसाठी भेटायला आलेल्या व्यक्तीची भेट घ्यावी. आणि 9 वाजे पर्यंत अंघोळी साठी जावे. अंघोळी नन्तर प्रार्थना, नाश्ता, अधिकाऱ्यांच्या भेटी या 10.30 पर्यंत घ्याव्यात. पूर्ण दुपार त्याने मंत्री परिषदेच्या मंत्र्या सोबत राज्य संबंधी चर्चा करावी. त्या नन्तर दुपारी 1.30 ते 3 दरम्यान विश्रांती घ्यावी आणि नन्तर सैन्याची पाहणी करावी. त्या नन्तर खबरे आणि गुप्तहेर कडून आलेले संदेशाची पाहणी करावी. अश्या प्रकारे अशोकाची दिनचर्या चाले. त्या सोबतच अशोकाने काही अश्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती, जे प्रजेला जर काही त्रास जाणवला तर त्या बद्दल 'कोणत्याही वेळी' राजा 'कुठेही' असला तरीही या अधिकाऱ्यानी येऊन अशोकाला या बद्दल माहिती द्यावी अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. या वरूनच दिसून येते की अशोक हा प्रजेच्या कल्याणाप्रति अत्यंत समर्पित असा सम्राट होता. इतिहासात 'नालंदा' हे मगध साम्राज्याचे विद्यापिठ म्हणून सुद्धा ओळखले जाते जे एक ज्ञानाचे विश्व केंद्र सुद्धा होते. असे सांगितल्या जाते की, या विद्यापीठाची स्थापना ही सम्राट अशोकाने केली.
     तसेच समुद्र मार्गे परदेशांशी व्यापार, शेती, उद्योग यांना अशोकाने प्रोत्साहन दिले. त्यासाठी कालवे बांधने, उद्योग व्यापारासाठी मोठे रस्ते बांधने, प्रवाश्यांसाठी झाडे लावणे, तसेच जे कुठेच मिळत नव्हते असे औषधी वनस्पती लावणे. त्याचबरोबर अशोक हा सर्वात प्रथम राजा आहे ज्याने पशु साठी दवाखाने बांधले. विहिरी,  विश्रामगृह बांधले. अशोकाच्या एक शिलालेखात हा उल्लेख आढळतो की अशोकाची अशी ईच्छा आहे त्याच्या साम्राज्यातले जंगलात राहणारे रहिवासी सुद्धा सुखी आणि आनंदी राहावेत.


     त्याच्या कार्यक्षेत्र त्याने 4 प्रांतात विभागले होते. प्रत्येक प्रांत हा एक राजकुमार किंवा तत्सम शाही परिवाराच्या सदस्यांच्या निगराणीखाली होता. प्रत्येक प्रांत हा जिल्ह्यामध्ये विभागलेला होता. आणि प्रत्येक जिल्हा हा गाव- गावांच्या एका गटात विभागला होता. आणि शासन यंत्रणेचा सर्वात शेवटचा घटक हा गाव ठेवण्यात आला होता. या सर्व गावाच्या गटासाठी एक सांख्यिकीअधिकारी, एक महसूल आणि कर अधिकारी, सरपंच, तसेच न्याय अधिकारी, जिल्हाधिकारी, लिपिक, राज्यपाल असे अनेक अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येकाला त्याच्या क्रमानुसार आणि श्रेणीनुसार वेतन देण्यात येत होते.
     ई. पू. 273 ला अशोक गादीवर आल्या पासून 12 वर्षा नन्तर अशोकाने कलिंग (आजचे ओरिसा) या देशाला मगध साम्राज्यात सामील करून घेण्याचा विचार केला परंतु कलिंग राजाने यास नकार दिला. यावर ई. पू. 261 ला मोठ्या सैन्याला घेऊन अशोकाने कलिंग राज्यावरती स्वारी केली. कलिंग देश स्वतःच्या स्वातंत्र्या साठी अत्यंत त्वेषाने लढला. परंतु अशोकाच्या मगध सैन्या पुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि अशोकाचा विजय झाला. अशोकाचा 13 वा शिलालेख या कलिंग युद्धावर प्रकाश टाकतो. 0.1 दशलक्ष कलिंग सैनिक यात मारले गेले. आणि इतर 0.15 दशलक्ष बंदी बनवण्यात आले. सारख्याच संख्येने मगध सैन्याची हानी झाली. हा प्रचंड संहार पाहून अशोकाचे हृदय द्रवले. मरण पावलेले सैनिक, त्यांचे घोडे, त्यांचे मृतदेह खाणारे गिधाड, रडणारे लहान मुलं, जखमी सैनिक, विधवा झालेल्या स्त्रिया हे सर्व अशोकाच्या मनात घर करून राहिले. आणि या विजयासाठी मोजावी लागलेली प्रचंड मोठी हानी पाहून अशोक जड अंतःकरणाने पाटलीपुत्रला परत आला.



     युद्ध हरल्या नन्तर युद्ध करणे सोडून देणारे आणि स्वतःची तलवार म्यान करणारे राजे इतिहासात अनेक पाहायला मिळतील परंतु युद्ध जिंकल्या नन्तर, अशोक त्याच्या शौर्याच्या सर्वोच्च स्थानी असताना, युद्ध करणे सोडून देणारा आणि स्वतः ची तलवार कायमस्वरूपी म्यान करणारा सम्राट अशोक हा जगाच्या इतिहासात एकमेव होता. या कलिंग युद्धाच्या प्रचंड हानी नन्तर अशोकाने यापुढे युद्ध न करण्याचा निश्चय केला तसेच मांसाहार संपूर्णपणे वर्ज्य केला. शाही मुदपकखान्यात सुद्धा मांसंहार वरती बंदी घातली तसेच त्याच्या राज्यात प्राण्यांची हिंसा करण्यावर बंदी घातली. कलिंगच्या हानी झालेल्या प्रदेशातील लोकांचे ज्या काही आडी- अडचणी, दुःख- त्रास असेल ते दूर करण्यासाठी अधिकारी पाठवले. कलिंग युद्धा नन्तर अशोकने आचार्य उपगुप्त यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व बौध्द धम्माचा अभ्यास केला. (या बद्दल सविस्तर आपण दुस-या लेखात पाहणार आहोत)


     अशोकाला याची जाणीव झाली की, सर्व विजयामध्ये धम्माचा विजय हा सर्वोत्कृष्ट आहे. युद्धाने जमिनी चा एखादा तुकडा जिंकता येतो परंतु प्रेम, स्नेहभाव याने लोकांचे हृदय जिंकता येतात. तलवारीच्या टोकाने रक्त सांडता येते पण धम्मचा विजय हा चिरकाल पर्यंत टिकणारा आनंद घेऊन येतो. अशोकाने दुसऱ्या धर्मा बद्दल सुद्धा आदरभाव व्यक्त करण्यास प्रजेला शिकवले. अशोकाने धम्माचा संदेश हा सर्वदूर पसरवण्यासाठी आणि जगातले जास्तीत जास्त लोक धम्माच्या ज्ञानाने शुद्ध आणि आनंदी होण्यासाठी अनेक भिक्खु भारता बाहेर सुद्धा पाठवले, तसेच अनेक स्तूप, विहार आणि शिलालेखांची रचना केली.


     ...दिवसेंदिवस अशोक वृद्ध होत होता आणि त्याचे 3 मूले महेंद्र, कुणाला आणि तीवला हे तिघेही धम्माच्या प्रसारात व्यस्त असताना अशोकाचे नातू दशरथ आणि संपादिन हे गादीच्या वारसा वरून भांडू लागले. त्यातच भर म्हणून त्याची एक पत्नी त्रिष्यरक्षिते कुणाला ची आई ही एक द्वेषपूर्ण स्त्री होती. तिला अशोकाचे साधी राहणी आवडली नाही त्यामुळे तीला राजेशाही जीवनाचा मोह आवरेना. तिच्या या वागण्यामुळे राजकुमार कुणाला अत्यंत दुःखी झाला व त्याच्या पत्नीला घेऊन तो तक्षशिला या ठिकाणी कायमचा निघून गेला आणि त्यांनतर कधीही त्याने मगधच्या गादी वरती हक्क सांगितला नाही. वयाच्या 72 व्या वर्षी देवनांप्रिय सम्राट अशोक हा चिरनिद्राधीन झाला.
     अशोकाच्या दानाचा विषय निघता अशोक हा अत्यंत मोठ्या मनाचा सम्राट होता. त्याच्या राज्यकोषातून काही भाग तो बुद्धाच्या संघाला दान देत असे. तसेच स्तूप बांधने, चैत्य बांधने अश्या गोष्टी मध्ये खर्च करत असे. कालांतराने कुणाला चा मुलगा संपादिन हा गादीवर बसला त्याने अशोकाच्या राज्य कोषातील या दानावर बंदी आणली. हे जेव्हा अशोकाच्या निदर्शनास आले तेव्हा अशोकाने, त्याला ज्या सोन्याच्या थाळीतून जेवण दिल्या जायचे त्या सोन्याच्या थाळ्या दान म्हणून विहारात संघाला अर्पण करायला सुरुवात केली. जेव्हा संपादिन च्या हे निदर्शनास आले, तेव्हा त्याने अशोकाला चांदीच्या थाळीतून जेवण देण्यास सांगितले. अशोकाने चांदीच्या थळी सुद्धा विहारात दान म्हणून अर्पण करायला सुरुवात केली. ही गोष्ट उघड होताच चांदीच्या थाळी ऐवजी तांब्याच्या थाळीतून अशोकला जेवण देण्यात येऊ लागले. अशोकाने तांब्याच्या थाळी सुद्धा अर्पण करायला सुरुवात केली. तांब्या ऐवजी अशोकाला चिकणमातीच्या थाळी मधून जेवण देण्यात येऊ लागले. अशोकाने चिकणमातीच्या थाळी सुद्धा विहारात दान म्हणून अर्पण करायला सुरुवात केली.




     शेवटी... तो दिवस आला जेव्हा अशोकाकडे दान करायला शेवटचे आमलाकी म्हणजे आवळा हे अर्धे फळ उरले . बाजूने एक वाटसरू जात असता अशोकाने त्याला जवळ बोलावले आणि ते अर्धे फळ अशोकातर्फे विहारात संघाला अर्पण करण्यास विनंती केली. आणि असे सांगण्यास सांगितले की, "मी तुम्हाला महान राजा कडून आलेली भेट अर्पण करीत आहे. ज्याने संपूर्ण जम्बूद्वीपावर राज्य केले त्या राजाची विनंती आहे की, हे अर्धे फळ आपण सर्व संघाने दान म्हणून स्वीकारावे व याचा आस्वाद घ्यावा." त्या वाटसरूने ही असेच केले. तो विहारात गेला. अशोक तर्फे फळ अर्पण केले आणि म्हणाला, "तो ज्याने या पृथ्वी वर तळपत्या सूर्य प्रमाणे राज्य केले. आज तो सायंकाळ च्या सूर्य प्रमाणे अस्ताला जात आहे." या नन्तर ते अर्धे आवळा फळ प्रमुख भिक्खु ने कुस्करून सूप मध्ये एकजीव केले आणि सर्व भिक्खुनी मिळून ते सूप प्याले.


शेवटी अशोकाने असे उद्गार काढले की, राज्य कोषा व्यतिरिक्त मी संघाला ही पृथ्वी देत आहे. जी ढगांनी भरलेली पर्वते आणि असंख्य रत्नांचा समावेश असलेला समुद्र यांनी समाविष्ट आहे. हे देण्यासाठी मला कुठल्याही स्वर्गात पुन्हा जन्म घेण्याची किंवा या पृथ्वीवर एखादा राजा म्हणून जन्म घेण्याची आवश्यकता नाही. आणि याचे फळ हे कधीच चोरल्या जाऊ शकत नाही. जे आर्याकडून सन्मान झालेला आहे आणि जे सर्व प्रवाहापासून सुरक्षित आहे. आणि मनाच्या सर्व बंधनापासून मुक्त आहे....
     त्यांनतर अशोकाचा मृत्यू झाला. तेव्हा राधागुप्त ने मंत्र्यांना सांगितले की जेव्हा सर्व मंत्री संपादीनला राजा करण्यात गुंग होते. तेव्हा अशोकाने संपूर्ण साम्राज्य संघाला भेट म्हणून दिले आणि त्याच बरोबर अशोकाची अशी इच्छा होती की, 100 करोड सोन्याची नाणी संघाला दान म्हणून देण्यात यावी. अशोकाच्या मृत्यू नन्तर 96 करोड सोन्याची नाणी संघाला देण्याचे ठरले, त्यातले 4 करोडच सोन्याचे नाणे संघाला देण्यात आले आणि उर्वरित राज्य कोशात पुन्हा टाकण्यात आले.


     अशोक हा देवांनाम प्रियदसी होता. म्हणजे जो देव आणि प्रजा या दोन्हीला प्रिय आहे असा. त्याच्या कडे जन्म आणि मृत्यू हे दोन्ही ही बहाल करण्याची ताकद होती. मौर्य साम्राज्यात अशोक एक अढळ असा प्रकाशमान तारा म्हणून जगाच्या इतिहासात अजरामर आहे. त्याच्या मृत्यू नन्तर 2500 वर्ष नन्तर सुद्धा जग त्याचा सन्मान करते आणि अशोकावरती प्रेम करते. अशोक स्वतः चा मार्गदर्शक झाला. तो स्वतः इतका महान होता की असे कोणीच नव्हते जे अशोकाच्या चुकांकडे बोट दाखवेल किंवा त्याला शिक्षा करेल. तरीही तो स्वतः च स्वतःकडून चूक होणार नाही याकडे जातीने लक्ष द्यायचा. त्याचे संपूर्ण जीवन हे लोकांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी समर्पित होते. आणि याचमुळे अशोक देवांच्या आणि प्रजेच्या आदर आणि प्रेम या सर्वास पात्र आहे. आजन्म अशोकाने देवनांप्रिय प्रियदर्शी हे नाव सार्थ केले.... 

Comments