NAPOLEON THE GREAT

 नेपोलियन बोनापार्ट. नेपोलियन I. फ्रान्स चा लष्करी नेता आणि बादशहा. १९ व्या शतकातील अर्ध्या यूरोपचा स्वामी. या महाकाव्याचा जीवनप्रवास अत्यंत नेत्रदीपक आहे. जगविख्यात योद्धा, कुशल रणनितीतज्ञ, लोकोपयोगी कायदे करणारा बादशहा. याने देशाच्या सैन्य , कायदेविषयक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये क्रांती केली.
     नेपोलियनचा जन्म १५ ऑगस्ट १७६९ रोजी, कॉर्सिका बेटातील अजाशिओ या गावी झाला. त्याच्या वडिलांचे नाव चार्लस् बोनापार्ट आणि आईचे लिटेशीया होते. नेपोलियनच्या जन्मापूर्वी कॉर्सिकाचे फ्रेंचांशी स्वातंत्र्ययुद्ध चालू होते. ही झुंज साठ वर्षे चालून अखेरीस फ्रेंचांचा त्यात जय झाला. नेपोलियनचे वडील वकिलीचा व्यवसाय करीत. वयाच्या ९ वर्षांपासून नेपोलियनचे शिक्षण बीन्नीच्या शाळेत झाले. १७८५ ला फ्रेंच मिलिटरी अकॅडमी मधून पदवी पूर्ण केल्या नंतर १७८९-१७९९ या फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात नेपोलियन सैन्यात भरती झाला. सुरुवातीला तो फ्रेंच सैन्याच्या तोफखाना रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट होता आणि १७९३-९४ च्या काळात नेपोलियनला सैन्यात ब्रिगेडिअर म्हणून पदोन्नती मिळाली.
     १७९५ ला नेपोलियनच्या सैन्यातील मोलाच्या कामगिरीबद्दल त्याला मेजर जनरल म्हणून पदोन्नती मिळाली. दरम्यान १७९६ पासून नेपोलियनची विजयी घोडदौड सुरूच झाली. हा फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ होता. याच वेळेस पॅरिस क्रांतीने पेटून निघाले. या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियन फ्रेंच डिरेक्टरी वर प्रथम वाणीज्यदूत बनला. त्याबरोबरच नेपोलियन फ्रान्सचा एक अग्रणी राजकीय व्यक्ती बनला.
     या फ्रेंच राज्यक्रांती नंतरच्या फ्रान्स मध्ये नेपोलियन ने एक स्थिरता आणण्याचे काम केले. स्वतःच्या अलौकिक बुद्दीमत्तेचा वापर करून त्याने लोकहितोपयोगी अनेक कार्ये केली. जेव्हा तो सत्तेत आला, तेव्हा नेपोलियनने दहशतीच्या कारकिर्दीत होणारी हानी सुधारण्याचा प्रयत्न केला. नेपोलियनने आधुनिक फ्रेंच शिक्षणाची पायाभरणी केली. सर्वप्रथम शासनाचे केंद्रीकरण केले; बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या. तसेच विज्ञान आणि कला यासारख्या विषयांना समर्थन दिले. यापैकीच 'नेपोलियन कोड' ही सर्वात महत्वपूर्ण कामगिरीपैकी एक आहे. सामान्य ज्ञान आणि समानतेवर आधारित कायदे (ज्याला नेपोलियन कोड म्हणून ओळखले जाते) यांचा एक सेट तयार केला.  ज्याने फ्रान्सच्या कायदेशीर प्रणालीला सुसंगत केले आणि आजपर्यंत फ्रेंच नागरी कायद्याची पायाभरणी करत आहे.
     २-१२-१८०४ रोजी नेपोलियन बहुमताने फ्रान्सचा बादशहा झाला. १८०५ नेपोलियनच्या ऑस्टरलिट्झच्या लढाईत त्याच्या महान विजयांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे साध्य केले ज्यामध्ये त्याच्या सैन्याने ऑस्ट्रिया आणि रशियन लोकांना पराभूत केले. या विजयाच्या परिणामी पवित्र रोमन साम्राज्याचा नाश झाला आणि राईन कॉन्फेडरेशनची स्थापना झाली. ऑस्टरलीझ च्या विजयाची वार्ता संपूर्ण युरोप मध्ये पसरली. ब्रिटन चे त्या काळचे पंतप्रधान विलियम पिट (दुसरे) हे सर्व सैन्यातील अधिकाऱ्यांसमवेत युरोप चा नकाशा बघत होते. ऑस्टरलीझ च्या विजयाची वार्ता त्यांच्या कान वर पडली तेव्हा त्यांनी त्या बैठकीतील सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, "हा युरोप चा नकाशा गुंडाळून ठेवून द्या. येणारे १० वर्ष आपल्याला याची गरज पडणार नाही." यावरून नेपोलियन ची युद्धकुशलता दिसून येते.
     नेपोलियन युद्धावर जाताना त्याच्या बरोबर त्याचे विविध विषयातील विद्वान-पंडित तसेच त्याची प्रचंड पुस्तके या सर्वांचा ताफा तो बरोबर घेऊन जात असे. नेपोलियन कलेचा मनापासून उपासक होता. अलौकिक विद्वान, एक रसिक, कलेचा उपासक, एक मुत्सद्दी, प्रचंड महत्वाकांक्षी आणि एक कुशल लष्करी रणनीतीकार असलेल्या नेपोलियन ने अत्यंत यशस्वीरीत्या युरोपियन देशांच्या विविध युतींविरुद्ध युद्ध केले आणि आपले साम्राज्य वाढवले.
     नेपोलियन हा एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि अलौकिक बुद्धिमान माणूस होता. युरोपियन देशांनी त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत युती स्थापन केली, पण वॉटरलूची प्रसिद्ध लढाई गमावण्यापूर्वी तो एल्बा येथे हद्दपार होऊनही सुटला आणि थोड्या काळासाठी पुन्हा त्याचे साम्राज्य ताब्यात घेण्यात यशस्वी झाला.
     १८१५ साली केलेल्या वॉटरलू येथील लढाईत पराभव होऊन त्याची रवानगी सेंट हेलिना बेटावर झाली. आणि वयाच्या ५१ व्या वर्षी रणदेवतेचा पुत्र चीर निद्राधीन झाला. १८४० मध्ये, त्याचे अवशेष फ्रान्सला परत आले आणि पॅरिसमधील लेस इनव्हालाइड्स येथे ठेवण्यात आले. त्याचा पराभव करणाऱ्या ड्युक ऑफ वेलींगटनने त्याच्याविषयी म्हटलंय -- " नेपोलियनची रणांगणावरची उपस्थिती चाळीस हजार फौजेच्या तोडीची होती, एवढा तो रणपटू व रणशूर होता ! "

नेपोलियन बोनापार्ट यांचे काही विचार --
    
1. क्षमता ही संधीशिवाय काहीही नाही.
2. धैर्य म्हणजे प्रेमासारखे असते; त्यास पौष्टिकतेची आशा असणे आवश्यक आहे.
3. अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोषात आढळतो.
4. महान महत्वाकांक्षा ही एखाद्या महान पात्राची आवड असते. ज्यांना या गोष्टी दिल्या आहेत त्या खूप चांगल्या किंवा वाईट गोष्टी करु शकतात. सर्व त्यांना निर्देशित करणार्‍या तत्त्वांवर अवलंबून असतात.
5. लोकांना मार्गदर्शन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांचे भविष्य दर्शविणे: नेता हा आशा बाळगणारा व्यापारी असतो.
6. आपल्या शत्रू चूक करत असेल तर त्याला कधीही अडवू नका.
7. एखादी गोष्ट चांगली करुन हवी असेल तर ती स्वतः करा.
8. जाणीवपूर्वक विचार करा, परंतु जेव्हा कृतीची वेळ आली असेल तेव्हा विचार करणे सोडून जा.
9. काहीही ठरवणे सक्षम होण्यापेक्षा कठीण, आणि म्हणूनच अधिक मौल्यवान आहे.
10. जोपर्यंत आपण आपले पंख पसरणार नाही तोपर्यंत आपण किती उडता येईल याची कल्पना नाही.
11. आपण एका शत्रूशी बर्‍याचदा लढा देऊ नये, याने आपण त्याला आपल्या सर्व युद्धाची कला शिकवाल.
     असा हा अत्यंत महत्वाकांक्षी योध्या बाबासाहेबांचा सुद्धा आदर्श होता. कुमार वयात असताना बाबासाहेबांनी अॅलन फॉरेस्ट लिखित नेपोलियन चे चरित्र वाचले होते. नेपोलियनच्या ठायी असलेल्या अलौकिक प्रतिभे मूळे बाबासाहेब प्रभावित झाले. त्यांच्या अनेक लेखन आणि भाषणात बाबासाहेबांनी नेपोलियनचा उल्लेख केलेला आपणास दिसून येतो. पैकी काही खलील प्रमाणे,

बाबासाहेबांनी नेपोलियन बद्दल मांडलेले विचार --
     "....खरे म्हटले असता ज्या काळी इंग्रजांनी हा देश काबीज करून घेतला त्यावेळी इंग्लंड देशाला नेपोलियनने 'दे माय धरणी ठाय' करून सोडले होते. इतके की हिंदुस्थानात राज्य करीत असलेल्या त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीस त्यांना द्रव्यबलाची व सैन्यबलाची मदत करणे अशक्य होते. उलटपक्षी नेपोलियनच्या तडाख्यातून सुटका करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीपासून द्रव्यबलाची व सैन्यबलाची मागणी केली....."  -- कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद १९ व २० मार्च १९२७
   
      "....ज्या शिवाजीने आपल्या लोकोत्तर गुणाने राज्य मिळवले ते त्यांचे राज्य चिरकाल का टिकले नाही ? त्याचे कारण हेच की त्या राज्याचा अभिमान सर्वांना सारखाच नव्हता. एक राजा गेला व त्या ठिकाणी दुसरा राजा आला तरी लोकांच्या नित्याच्या व्यवहारात काहीच फरक होत नसे. नेपोलियनच्या इंग्लंड वरील स्वारीचे वेळी इंग्लडातील मजूर लोकांनी आपल्या देशातील लोकांना जे उत्तर दिले तेच उत्तर या ठिकाणी लागू पडते...."  -- बहिष्कृत भारत : २० मे १९२७

Comments